संपन्न झालेले कार्यक्रम २०१९-२०

२५ जून २०१९-पोलीस अधिकारी सतर्कतेविषयी मार्गदर्शन करताना. 

आज दिनांक २५ जून २०१९ रोजी वनराई पोलीस ठाण्यातील एटीसी (ATC ) विभागातील पीएसआय (PSI)श्री .आवटी ,तसेच श्री .थोरात,श्री .जगताप,श्री .मर्दे यांनी शाळेस भेट दिली .दुपारी 12.30 ते 1 या वेळेत पूर्व प्राथमिक ते माध्यमिक मधील मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सुरक्षा रक्षक यांना मार्गदर्शन केले .कळंबोली परिसरात शाळेच्या आवारात घडलेला प्रसंग त्यांनी कथन केला .तशी घटना अथवा प्रसंग आपल्या हद्दीत घडू नये या दक्षतेसाठी ते शाळा भेटी करत असल्याचे त्यांनी सांगितले .शाळा अथवा शाळेच्या आवारात किंवा इतर ठिकाणी परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू ,व्यक्ती ,अथवा बॉम्बजन्य काही आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले .याव्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देऊन कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे स्पष्ट केले .अशा वेळी कोणती खबरदारी घ्यावी ,एटीएम मधून रक्कम काढताना घ्यावयाची काळजी इत्यादींविषयी मार्गदर्शन केले .आम्ही विचारलेल्या शंकांचे निरसनही केले .पालकसभा अथवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलवायचे असल्यास त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांकही शाळेत देऊन ठेवले आहेत .अशा वेळी आम्ही व्हिडीओ क्लिप्स दाखवूनही मार्गदर्शन करू असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले .पर्यवेक्षिका मोरे बाईंनी शेवटी त्यांचे आभार मानले .

२३ जून २०१९ – सन्मित्र मंडळ, गोरेगाव – हीरव महोत्सवी वर्ष – सांगता समारंभ

२३ जून २०१९ – सन्मित्र मंडळ, गोरेगाव – हीरव महोत्सवी वर्ष – सांगता समारंभ‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. १० बाय १०च्या खोलीत पाच-सहा मुलांपासून सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग आणि १२०० विद्यार्थी पटसंख्या असणारी सन्मित्र मंडळ ही पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य संस्था झाली आहे.२०१८-१९ हे संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना केवळ ‘सेलिब्रेशन’ हे उद्दिष्ट न ठेवता वर्षभर शिक्षकांचे प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी गुणात्मक आणि कलात्मक स्पर्धा, माजी विद्यार्थी, शिक्षक पालक व समाजातील शुभेच्छुक यांच्याशी संपर्क व संवाद असे अनेक कार्यक्रम संस्थेने आयोजित केले होते. सांगता समारंभात या सगळ्याचे सिंहावलोकन करण्यात आले. शाळेची सद्यस्थिती पाहून पुढील यशस्वी वाटचालीचा संकल्प करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तावडे यांचे आगमन झाल्यावर विद्यार्थ्यांचे घोषपथक त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पर्यवेक्षक रेखा मोरे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यासोबत तावडे यांचे चहापान व अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यानंतर माधव सभागृहात प्रत्यक्ष सांगता समारोहाला सुरुवात झाली.माजी मुख्याध्यापिकांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. सरस्वतीवंदनाही सादर झाली. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र पुराणिक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संस्थेचा ६० वर्षांचा आढावा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अॅड. नारायण सामंत यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडला. हीरकमहोत्सवी वर्षात झालेल्या कार्यक्रमांची माहिती कार्यकारिणी सदस्य अरुणा सप्रे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी तावडे यांचे स्वागत करून सन्मित्र मंडळाचे स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट दिले.विनोद तावडे म्हणाले, ‘सन्मित्र मंडळासारख्या संस्था विद्यार्थ्यांना घडवत असतात. १०० टक्के निकाल असा आग्रह धरण्यापेक्षा आपल्याला ‘थ्री इडियट’मधील रांचो निर्माण करायचे आहेत, यावर भर द्यावा. त्यासाठी वाईतील जिल्हा परिषद शाळांमधील ‘कुतूहल कोपऱ्याचे’ उदाहरण पाहावे. मातृभाषेतील शिक्षण आवश्यक व अतिशय उपयोगी आहे.’मातृभाषेला डोळ्याची तर इंग्रजी भाषेला चष्म्याची उपमा देऊन, तावडे यांनी मराठी माध्यमातून शिक्षण चालू ठेवल्याबद्दल सन्मित्र मंडळाचे राज्याच्या वतीने अभिनंदन केले. शाळेतील ई-लर्निंग, इंग्रजी संभाषण वर्ग, संगणक प्रशिक्षण व सेमी इंग्लिश अशा अनेक उपक्रमांबद्दल सर्व मुख्याध्यापक व त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी शाबासकी दिली व असेच प्रयोगशील राहून मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू ठेवण्याचे आवाहन केले.

मराठी माध्यमातील मुलांना स्पर्धात्मक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून लोकल ते ग्लोबल असा नवा अभ्यासक्रम तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हा अभ्यासक्रम तयार करताना डॉ. काकोडकर, डॉ. भाटकर, डॉ. माशेलकर, सोनम वांगचूक अश्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या जोडीला ओपन बोर्ड सुरू केले. महाराष्ट्र राज्य शिक्षणात १६व्या क्रमांकावर होते. कृती शिक्षण आणि अशा अनेक प्रयोगांमुळे ते आता तिसऱ्या क्रमांकावर आले,’ असे ते म्हणाले. तीन वर्षांत राज्यात ३६ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळेत आल्याचेही सांगितले.‘तुम्ही वाचता, तुम्ही विसरता, तुम्ही बघता, तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्ही करता आणि तुम्ही समजता’ हा कृती शिक्षणामुळे होणारा बदल आहे.एकीकडे मुंबईसारख्या शहरातील मराठी शाळेतील भरतीचा टक्का घसरत असताना सन्मित्र मंडळामध्ये या वर्षी १००हून अधिक प्रवेश वाढले आहेत, हे कौतुकास्पद आहे,’ असे तावडे म्हणाले. ‘पुढील वाटचालीत नवीन वास्तूत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास हे अभ्यासक्रम चालू करा आणि नवीन उपक्रमांच्या उद्घाटनासाठी मी नक्की येईन,’ असे आश्वासन त्यांनी दिले.नंदिनी भावे, वैशाली सावंत आणि सिद्धार्थ गव्हाळे या सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या विभागाच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेचे सदस्य नीलेश ताटकर यांनी ‘निर्माणोंके पावन युग में, हम चरित्र निर्माण न भुले’ हे गीत सादर केले. नंतर संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संस्थेचे खजिनदार अजित वर्तक यांनी आभारप्रदर्शन केले. संस्थेचे शुभेच्छुक व माजी विद्यार्थ्यांनी www.sanmitramandal.org ही वेबसाइट, तसेच फेसबुक व यू-ट्यूबच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पगारे बाईंनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

१७ जून  २०१९ -सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) सकाळ अधिवेशनातील प्रथमदिनोत्सवाची सुरुवात

सोमवार दिनांक १७ जून  २०१९  रोजी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) सकाळ अधिवेशनातील प्रथमदिनोत्सवाची सुरुवात सकाळी 6.55 पासून व दुपार अधिवेशनाची दु12.40 पासून उत्साहाने झाली. सर्व शिक्षक व मा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते. वातावरण निर्मितीसाठी ' हीच अमुची प्रार्थना 'हे सुमधुर गीत ऐकवण्यात आले. राष्ट्रगीत, शालेय प्रार्थना, प्रतिज्ञा,झाल्यानंतर शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शालेय जीवनातील प्रगतीसाठी शिस्त, स्वच्छता , शालेय नियम तसेच अभ्यासातील सातत्य या गोष्टींचे महत्त्व समजावून दिले. मा. पर्यवेक्षका सौ. मोरे बाई यांनी "स्कूल चले " हे गीत ऐकवून विद्यार्थ्यांना उत्साहित केले. इ. ८ वी अ, ब मधील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण मा. मुख्याध्यापक श्री गव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. चार तासिकांनंतर मुलांना गोड खाऊ देऊन सोडण्यात आले. अशा प्रकारे सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (गोरेगाव) येथील प्रथमदिनोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.

१३ जून २०१९-नूतन शिशु मंदिर शिशुवटीकेचा प्रथमदिनोत्सव साजरा झाला.

आज गुरुवार दि. १३ जून २०१९ रोजी नूतन शिशु मंदिर शिशुवटीकेत प्रथमदिनोत्सवाची लगबग चालू होती. सकाळी ७ वाजल्यापासून भक्तीगीतं, सनई, बालगीतांनी शाळेचा परिसर एक  वेगळ्याच वातावरणाने भारलेला होता. प्रत्येक विद्यार्थी  आपापल्या पालकांबरोबर आनंदाने शाळेत आला. प्रत्येकाचे तिलक करून, अत्तर लावून, पेढा देऊन स्वागत केले. एकीकडे धून चालू होती ताईंच्या मार्गदर्शनाने पालक आणि विद्यार्थी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. पालकांनमधीलच एका जेष्ठ आजीनंकडून दीपप्रज्वलन केले वंदना झाली. युक्तताईंनी सूत्रसंचालन हाती घेतले पालकांचे विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यावर जयश्रीताईंनी प्रास्ताविक केले त्यात मुलांनि उचललेल्या शिक्षणा संदर्भातील पहिल्या पावलांचे महत्व  आपली कर्तव्य, जबाबदारी, तुमची आमची भूमिका स्पष्ट केली.  नंदिनीताईंनी सगळ्या शिक्षकांचा मवश्यांचा  वर्गनिहाय, गटनिहाय परिचय करून दिला.
 त्यानंतर  प्राचिताईंनी संकल्प व अग्निहोत्राची सूत्र हाती घेतली त्यात आपले पाल्य आजपासून जे शिक्षण घेणार आहेत त्यातून एक चांगला माणूस घडेल व समाजकार्यासाठी त्याचा उपयोग होईल असा संकल्प पालकांनकडून करून घेतला.
जयश्रीताईंनी महत्वाच्या सूचना सांगितल्यावर संस्थेचे संयुक्त कार्यवाह श्री प्रशांतजी आठले यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला एक ज्यूटची बॅग व स्टीलचा डबा देण्यात आला. डबा बॅग घेतल्यावर पलकांबरोबर  सगळी मुलं सजवलेल्या वर्गात वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याशी मनसोक्त खेळत होती जुन्या मुलांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसत होता तर नवीन मुलं आपल्या पलकांबरोबर उत्सुकतेने शाळेतल्या प्रत्येक प्रसंगाचा आनंद घेत शाळेतील इतर मित्रमैत्रिणींबरोबर ओळख करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती.
आशा प्रकारे सन्मित्र मंडळ, गोरेगाव संचालित 
विद्याभारती संलग्नित 
 नूतन शिशु मंदिर शिशुवटीकेचा प्रथमदिनोत्सव साजरा झाला.

 2019  :  सन्मित्र मंडळ, गोरेगाव 

वेबसाइट निर्मिती : प्रशांत जाधव / अजित वर्तक

संकल्पना - अमेय पेडणेकर

छायाचित्रे : मेघनाद गणपुले