संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

१५ ऑगस्ट २०१९ - स्वातंत्र्यदिनाचे ७३वे वर्ष. (शब्दांकन – सौ. वर्षा पगारे)

१५ ऑगस्ट २०१९ - स्वातंत्र्यदिनाचे ७३वे वर्ष. (शब्दांकन – सौ. वर्षा पगारे)
सकाळी ठीक ७ वाजता विद्यार्थी स्वच्छ गणवेशात उपस्थित होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, पालक ,हितचिंतक उपस्थित होते. शालेय पटांगणात ध्वजारोहणाची व्यवस्था करण्यात आली.ध्वनिमुद्रणेद्वारे देशभक्तीपर गीते ऐकवल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. सकाळी ठीक ७.३०वाजता संस्थेचे मग. अध्यक्ष श्री. जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त घोषणा देण्यात आल्या. तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर समूहगीते सादर केली. वैयक्तिक वीरगीत व वीरकथाकथन यांचे सादरीकरण करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ. सावंत बाई व त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर समूहगीताला विशेष दाद मिळाली. 

 

माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. गव्हाळे यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच नुकत्याच संविधानात झालेल्या काश्मीर संबंधी कलम ३७०व ३५अ बदलाचा उल्लेख करून झालेल्या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जोशी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त नागरिकांची लवकरात लवकर योग्य व्यवस्था व्हावी अशी आशा व्यक्त केली. व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे पदाधिकारी मा. श्री. विद्वांस , मा. श्री. सोहोनी व मा. श्री. सामंत, तीनही विभागाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून भारतमातेच्या प्रतिमेला मा. श्री. जोशी सरांनी राखी बांधली व भारतमातेच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेतली. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निशाणकर व श्री. पाटील सरांनी केले. कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांना वाद्यांची साथ श्री. मोहिते, श्री. सुर्यवंशी, श्री. बाईत व श्री. सीताराम यांनी केली. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटून घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शालेय जीवनापासून कितीही दूर गेलो तरी शाळेतील आठवणी मात्र कायम आपल्या सोबत असतात म्हणूनच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. वैभव घुले (जे नुकतेच अमेरिकेतून भारतात आले होते ) शाळेत स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत माजी विद्यार्थी श्री संतोष साटम उपस्थित होते ही शाळेसाठी नक्कीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे .