संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

३० सप्टेंबर  २०१९ - सन्मित्र मंडळ विद्या मंदिर - शैक्षणिक सहल ( कर्नाळा पक्षी अभयारण्य व युसुफ मेहेरअली सेंटर)

दि.३० सप्टेंबर - सन्मित्र मंडळ विद्या मंदिर - शैक्षणिक सहल ( कर्नाळा पक्षी अभयारण्य व युसुफ मेहेरअली सेंटर) - शब्दांकन - सौ कदम.
दि.30सप्टेंबर - रोजी ठीक 7.30 वाजता आमच्या शाळेची शैक्षणिक सहल कर्नाळा पक्षी अभयारण्य व युसुफ मेहेर अली सेंटर पाहण्यासाठी रवाना झाली.सहलीसाठी इ 10अ व 10ब वर्गातील106 विद्यार्थी व बरोबर चार शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री गव्हाळे सर ,श्री पाटील,श्री निशाणकर,व सौ .कदम उपस्थित होते.बरोबर श्री कोळी सुद्धा होते.आम्ही ठीक 10,30वाजता कर्नाळा अभयारण्यात पोहोचलो. कर्पाळा, पनवेल पासून 12 किमी अंतरावर आहे.
विविध पक्षांना येथील वातावरणाने भुरळ घातली आहे.येथे सुमारे १३४्रजतिचे स्थानिक पक्षी व नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीतआलेले सुमारे ३८ प्रजातीचे स्थलांतरित पक्षी आढळतात. तुरेवाला सर्पगरूड,खरूची,कायाशी, शिक्रा ,किंगफिशर यासारखे पक्षी तसेच रानमांजर,ससा,भोकर,रानडुक्कर, वानर प्राणीही अवचित दर्शन देतात.येथे ६४२ विविध प्रकारच्या वृक्ष प्रजाती, वेली, वनोषधी व दुर्मिळ वनस्पती अस्तित्वात आहेत.

अभयारण्य पाहून झाल्यावर आम्ही युसुफ मेहेर अली सेंटर पाहण्यासाठी साधारण 12.30 ला तिथून निघालो.मेहेर अली सेंटर येथे पोचल्यावर प्रथमतः दुपारचे जेवण घेतले व त्यानंतर सेंटर मधील विविध उपक्रमांना भेटी दिल्या.यामध्ये कुंभारकाम विभाग, साबण विभाग, गांडूळ संवर्धन व गांडूळ खत निमिर्ती ,तेल निर्मिती, बायोगॅस प्रकल्प व नर्सरी हे विभाग पाहण्यासारखे आहेत.तेथील उत्पादन विद्यार्थ्यांनि विकत घेऊन तेथील उपक्रमांना हातभार लावला.सर्व पाहून झाल्यावर परतीच्या प्रवासाला सुरवात केली.ठीक 6 .00 वाजता शाळेत पोचलो. अशाप्रकारे शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग असलेली इ 10 च्या विद्यार्थ्यांची कर्नाळा पक्षी अभयारण्य व युसुफ मेहेर अली सेंटरची शैक्षणिक सहल अभ्यासपूर्ण व यशस्वी झाली.

२५ सप्टेंबर  २०१९ - नूतन शिशुमंदिर - सन्मित्र मंडळ, गोरेगाव संचालित विद्याभारती संलग्नित

नूतन शिशुमंदिर - सन्मित्र मंडळ, गोरेगाव संचालित विद्याभारती संलग्नित नूतन शिशुमंदिर शिशुवाटिकेत दर आठवड्याला एक विषय घेऊन आठवड्याचे नियोजन केले जाते. नियोजन करत असताना जीवनाचा घनिष्ठतम अनुभव - संस्कार आणि चरित्र निर्माण - क्षमतांचा विकास हे मूळ उद्देश विचारात घेतले जातात. त्याला अनुसरून उद्देश विस्तारात वेगवेगळे विषय असतात. त्यातला या आठवड्यात आम्ही आवाज हा विषय घेतला होता. विषया संबंधितच १५ क्रियाकलाप (कृती) आठवड्याला निवडले. आज मंगळवार

गाणं - रेल मे छनंन,
गोष्ट - लांडगा आणि शेळी,
खेळ - वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज,
गृहकार्य - वाद्यांचा परिचय,
वार्तालाप (गप्पागोष्टी) -आवाजाचा आपल्यावर होणारा परिणाम (ध्वनीप्रदूषण).
अशा क्रिया निवडल्या होत्या.
एवढं सगळं मुलांबरोबर अनुभवताना एक प्रयोग करण्याची बुद्धी भगवंतांनी दिली ती म्हणजे मौन व्रत ३ ते ६ वयोगटातील हल्लीच्या मुलांना ५ मिनिट गप्प बसवणे म्हणजे आपलीच परीक्षा असते. पण आजच्या या परीक्षेतून खूप काही शिकायला, अनुभवायला मिळालं. सकाळी १०.१५ ला आमचं मौन व्रत सुरू झालं सुरवातीला आपल्याला नक्की काय करायचं आहे याची कल्पना मुलांना दिली नंतर नुसत्या खाणाखुणा करून आम्ही मुलांशी आणि मुलं आमच्याशी, त्यांच्यात्यांच्यात एकमेकांशी संवाद साधत होती.

अगदी जेवणाआधी रांगेत हातपाय धुवून, आपला डबा,पाणीप्यायच भांड घेऊन, जागेवर बसेपर्यंत कसलाच आवाज मुलांनी केला नाही. रोज डबा खाऊन हेडगेवार सभागृहात दंगा करणारी मुलं पुस्तक पाहण्यात मग्न होती. ११.०० ला शाळा सुटून घरी जाण्यासाठी मुलांना आम्ही गेटवर नेलं तरी कोणतीही सूचना न देता मौन शरीरात भिनलेली मुलं आज वेगळीच जाणवत होती. पालकांशी बोलतानाही आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.दिवसभर तिनही सत्रातील मुलांबरोबर मौन अनुभवताना असं लक्षात आलं की मुलांमधील एकाग्रता, संयमिवृत्ती, शांतता वाढवायची असल्यास चंचलता, क्रूरता, हट्टीपणा घालवायचा असल्यास प्रत्येक कुटुंबाने रोज किमान अर्धातास मौन पाळले पाहिजे. त्यातही आशा वेळी की जास्तीत जास्त व्यक्ती घरात असताना. एकदा आपल्याला आपलाच अंदाज आला की या मौनाची वेळ वाढवत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. आम्हीही दर आठवड्याला हा प्रयोग करून तीन तासांची मौन शिशुवाटिका अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म घ्यालना मौनाचा अनुभव आमच्यासारखा तुम्हीही.
पण मंडळी जे मौन धरणार त्याची कुटुंबाला कल्पना देऊन मगच प्रयोग करा हं. आणि संपूर्ण कुटुंबाला या प्रयोगात सामावून घ्या. नाहीतर नेहमी मौन धरत असाल तशानी चिडचीड वाढायची. आणि नेहमीचंच आहे असं समजून घरातलेही दुर्लक्ष करतील.

प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा !