संपन्न झालेले कार्यक्रम

मागील कार्यक्रम
पुढील कार्यक्रम

७ डिसेंबर -२०१९ - बुद्धिबळ - Twenty ~ 20 सायमलटेनियस चेस प्ले

७ डिसेंबर -२०१९ - बुद्धिबळ - Twenty ~ 20 सायमलटेनियस चेस प्ले– श्री. शरद वझे. (शब्दांकन - सौ. सारिका जाधव)

संकल्पना – २४ सप्टेंबर २००७ रोजी भारताने पहिला २०-२० क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आणि पुढील दोन दिवसात मुंबईत सर्व टीमची मोठी मिरवणूक निघाली. सगळ्या भारताने त्यांना डोक्यावर घेतले. त्याच दरम्यान विश्वनाथन आनंद भारताचा बुद्धिबळातील पहिला विश्वविजेता ठरला. TV वर केवळ ही बातमी स्क्रोल ला येवून गेली पण त्याच्या यशाच्या मनाने त्याचा यथोचित सन्मान झाला नाही. गंमत म्हणजे ज्या खेळाचा शोध हजारो वर्षापूर्वी भारतात झाला, त्याखेळाबद्दल भारतीय एवढे उदासीन का ? शरदच्या नसानसात बुद्धिबळ असल्यामुळे त्याने ह्याच क्षणी बुद्धिबळ ह्या खेळाचा भारतभर प्रसार करण्याचा निश्चय केला. त्यांनी त्यासाठी सायमलटेनियस चेस प्ले हा फॉरमॅट निवडला आणि त्याला " Twenty ~ 20 सायमलटेनियस चेस प्ले " असे सूचक नाव दिले. शरदने २००७ पासून भारतातील ११५ ठिकाणी अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि आज सन्मित्र मंडळ विद्या मंदिर च्या माधव सभागृहात आयोजित केलेला हा ११६ वा कार्यक्रम, कि ज्यात सन्मित्र शाळेच्या १४९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

शरद वझे हा सन्मित्र मंडळ विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी (१९७६) आहे ह्याचा आम्हाला खरच अभिमान आहे.

ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध बुद्धिबळ पटू पद्मश्री, अर्जुन, श्री छत्रपती पुरस्कार यांनी विभूषित झालेल्या श्रीमती भाग्यश्री ठिपसे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:४५ वाजता त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पगारे बाई यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत ९वि च्या विद्यार्थिनींनी एक स्वरमयी स्वागतगीत सादर करून केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. गव्हाळे सर यांनी करून दिला. संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय जोशी ह्यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांना पुष्प व मुलांनी तयार केलेली शुभेच्छा कार्डे देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर बुद्धिबळपटू व माजी विद्यार्थी श्री.शरद वझे यांनी मुलांशी संवाद साधला व स्पर्धेची संकल्पना, नियम समजून सांगितले . प्रमुख पाहुणे पद्मश्री श्रीमती भाग्यश्री ठिपसे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष श्री विजय जोशी यांनी कार्यक्रमाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व कार्यवाह श्री. प्रकाश नानिवडेकर ह्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. भाग्यश्री ठिपसे यांनी पहिली खेळी करून प्रत्यक्ष Twenty ~ 20 खेळाला सुरुवात करून दिली. बुद्धिबळाचे एकूण 20 पट मांडण्यात आले होते. एका तासात श्री. शरद वझे २० खेळाडूंबरोबर एकत्र खेळत होते.खेळाचे समालोचन व प्रशिक्षण करत ते मुलांशी संवाद साधत होते. इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्याचा या खेळात सहभाग होता आणि एकूण १४९ विद्यार्थ्यांनी ह्यात भाग घेतला होता. ह्या स्पर्धेत श्री ओजस जोशी (चेस ट्रेनर), श्री विवेक जोशी, श्री. भावसार (वरीष्ठ पोलिस निरीक्षक), श्री भालचंद्र गानू, श्री सर्वेश साने (C. A व शाळेचे माजी विद्यार्थी), श्री. जयंत दैठणकर,श्री. अल्पेश शहा असे गोरेगावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्व मुले बुद्धिबळ खेळाचा आनंद घेत होती. शाळेतील वातावरण बुद्धिबळमय झाले होते. सकाळी १०:३० वाजता चालू झालेली स्पर्धा 6 वाजले तरीही चालू होती, शरद वझे अविरत खेळत होते आणि मुलांचा खेळण्याचा उत्साहही कमी झालेला नव्हता. प्रत्येक स्पर्धकाला खेळ संपल्यावर “A+”,”A” व “B” असे मानांकन देण्यात आले. स्पर्धा संपल्यावर शरद वझे ह्यांनी शाळेतील शिक्षकांना बुद्धिबळ खेळाचे मार्गदर्शन केले.

शरद वझे ह्यांना शाळेची छात्रबोधीनी, व सन्मित्र मंडळाच्या ६० वर्षांच्या वाटचालीवरील पुस्तिका देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम म्हणजे सन्मित्र मंडळ विद्या मंदिरच्या इतिहासातील एक सुवर्णमय क्षण आणि शरद सारखेच अनेक बुद्धिबळ पटू ह्या शाळेतून निर्माण होतील ह्यात शंका नाही.

७ डिसेंबर -२०१९ – टाटा मोटर्स तर्फे सन्मित्र मंडळ च्या सर्व शिक्षकांचे फेलीसिटेशन CSR अंतर्गत शिक्षण

७ डिसेंबर -२०१९ – टाटा मोटर्स तर्फे सन्मित्र मंडळ च्या सर्व शिक्षकांचे फेलीसिटेशन

टाटा मोटर्स CSR अंतर्गत शिक्षण, आरोग्य व महिला सशक्तीकरण ह्या विषयांत योगदान देणाऱ्या संस्थाना मदतीचा हात देत असते, व जोडीला ह्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचार्‍यांनाही प्रोत्साहन देण्याचे काम करते.

ह्या महिन्यात काही निवडक शैक्षणिक संस्थाच्या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आणि आम्हाला अभिमान आहे कि त्यांनी सन्मित्र मंडळची ह्यासाठी निवड केली. सन्मित्र मंडळाच्या सर्व विभागातील शिक्षकांना त्यांनी प्रशस्तीपत्रक व शाळेसाठी एक सन्मानचिन्ह दिले.
शाळेच्या शिक्षकांसाठी वासन मोटर्स ह्या त्यांच्या बोरिवलीतील डीलर तर्फे सवलतिची योजनाही उपलब्ध करून दिली आहे

शिक्षकांच्या सत्कारानंतर संस्थेचे संयुक्त कार्यवाह श्री. प्रकाश नानिवडेकर ह्यांनी टाटा मोटर्स मधून आलेल्या मान्यवरांचे पुष्प देवून आभार व्यक्त केले व संस्थेचे खजीनदार श्री. अजित वर्तक ह्यांनी संस्थेच्या ६० वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रेझेन्टेशन दिले व संस्थेतर्फे विद्याभारतीशी संलग्नित चालणाऱ्या नूतन शिशु मंदीर ह्या पूर्व प्राथमिक उपक्रमाची चित्रफित सादर केली. उपस्थित मान्यवरांनी “हे उपक्रम बघून आपण भारावून गेलो आणि असेच उपक्रम आपण अन्य शाळात राबवले पाहिजेत” असे मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर त्यांनी शाळेची पाहणी केली आणि माधव सभागृहात चालू असलेल्या “बुद्धिबळ Twenty-२०” ह्या कार्यक्रमाची झलक बघितली. टाटा मोटर्स व शाळेचे ऋणानुबंध वृद्धिंगत होवोत अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शाळेतील शिक्षकांची रजा घेतली.