संपन्न झालेले कार्यक्रम

२९ जानेवारी २०२१- कै. सौ. अरुणा सुनिल सप्रे - श्रद्धांजली सभा

🙏 कै. सौ. अरुणा सुनिल सप्रे - श्रद्धांजली सभा 🙏

दि.२७ जानेवारीला अरुणा ताईंच्या आकस्मिक जाण्याने सर्व सन्मित्र परिवारात शोककळा पसरली.गेले काही वर्षे कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत असतानाही, त्यांचा सन्मित्र मंडळाच्या अनेक उपक्रमात सिंहाचा वाटा होता. त्यांच्या योगदानाला वंदन आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी २९ जानेवारी ला सकाळी ११ वाजता शाळेच्या माधव सभागृहात श्रद्धांजली सभा नियोजित केली होती.

सभेचे संचालन श्रीमती गावडे बाईंनी केले. सभेला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सन्मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. त्यांचा शाळेशी प्रत्यक्ष संबंध सुरुवातीला एक पालक म्हणून आला. त्याचवेळी त्या गणित-विज्ञान-इंग्रजी विषयांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागल्या. पुढे त्या संचालक मंडळाच्या म्हणजेच संस्थेच्या कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या. ह्या प्रवासातील त्यांच्या अनेक आठवणी शिक्षक व तिन्ही विभागांचे मुख्याध्यापक ह्यांनी कथन केल्या. तसेच त्यातून आपल्याला मिळणारी प्रेरणा व मार्गदर्शन यांचा उल्लेख आपल्या श्रध्दांजलीतून व्यक्त केला.

संस्थेच्या विश्वस्तांनी अरुणाताईंचे मंडळाच्या अनेक उपक्रमातील योगदान हे दिपस्तंभासरखे राहील आणि त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अश्या भावना व्यक्त केल्या.

शांती मंत्र आणि कै.सौ. अरूणाताईंच्या प्रतिमेस वंदन करून सर्वांनी त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना केली. 🙏

१६ जानेवारी २०२१- वेशभूषा स्पर्धा - तृतीय पारितोषिक

१६ जानेवारी २०२१ - वेशभूषा स्पर्धा - तृतीय पारितोषिक

बृहन्मुंबई महानगरपालिका खाजगी प्राथमिक शाळा शिक्षण विभागातर्फे 16 जानेवारी 2021 रोजी बोरिवली व गोरेगाव विभागातील शिक्षकांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा उत्कर्ष विद्यामंदीर, मालाड (पूर्व) या शाळेत संपन्न झाली. स्पर्धेचा विषय होता भारतातील कोणतेही राज्य, जिल्हा, तालुका, गाव याचे नेतृत्व करणे. सदर स्पर्धेत आपल्या प्राथमिक विभागातील श्रीमती अजिता सुरेश लाड यांनी सहभाग घेऊन पंजाब राज्याचे नेतृत्व केले. स्पर्धेत एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला होता. श्रीमती अजिता सुरेश लाड यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून शाळेस यश प्राप्त करून दिले.
या यशाबद्दल सन्मित्र परिवारातर्फे श्रीमती अजिता सुरेश लाड यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.